प्रतिनिधी – गणेश वाळुंज
नखाने चित्र रेखटणारा अवलिया मोकळे रंगनाथ
चक्रधराची किमया…
जीवन प्रवासात कोण कुठे भेटेल याचा पत्ता लागत नाही. माझा व्यवसाय छायाचित्र काढणे आहे. सतत कोणी ना कोणी आपल्या कामानिमित्त येत राहते. खरं तर आजकाल खास स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढणे हे आता दुरापास्त झाले आहे. प्रत्येकाच्या खिशात कॅमेरा आहे. पूर्वीच्या तुलनेत आता स्टुडिओमध्ये येऊन छायाचित्र काढून घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. प्रत्येकाचे आयुष्य गतिमान झाले आहे. थांबायला वेळ नाही . काही क्षणात छायाचित्र मिळाले कि ती व्यक्ती दिसेनासी होते. संवादाला कोणाला वेळ नाही. अशाही परिस्थितीत जर तुम्हाला संधी मिळाली तर दोन शब्द बोलायला हरकत नसते. कदाचित त्या संवादातून काहीतरी नक्कीच चांगले सापडते….
दोन दिवसापूर्वी दुपारी मी असाच बाहेरून माझ्या स्टुडिओला येत असताना आमच्या शेजाऱ्याला नमस्कार घातला . त्यांच्या दुकानात दोघे तिघेजण बसलेले होते. त्यात माझा एक मित्रही होता आणि त्या तिघांच्या मध्ये एक साधारण साठी ओलांडलेली व्यक्ती आपल्या हाताची घडी घालून शांतपणे बसलेली होती . ती व्यक्ती माझ्या परिचयाची नव्हती . मी आपला नेहमीप्रमाणे शेजाऱ्याला नमस्कार घालून मागे फिरणार इतक्यात त्याच्या दुकानाच्या कॉउंटरवर एका छोट्या पांढऱ्या कागदाच्या , तळहातावर बसेल इतक्या लहान तुकड्यावर अप्रतिम कोरीव काम केल्याप्रमाणे एक चित्र शिल्प दिसले ..मी ते क्षणात हातात घेतले आणि मित्राला विचारले कि हे तुला कोणी दिले? तर तो माझ्या मागे बसलेल्या ” त्या ” व्यक्तीकडे बोट करून म्हणाला हे काय ह्या बाबांनी बनवलंय … मी आश्चर्य चकित होऊन त्या अवलियाकडे पाहताच राहिलो … ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती . साधारण अंगकाठी , नीटनेटके , मागे केस विंचरलेले , डोळ्यावर काळया दांडीचा चष्मा , कानावर केसांचा झुपका आणि डोळ्यात करुणा …. मी त्यांना क्षणाचाही विलंब ना करता म्हटले सर तुम्ही काढले हे चित्र ? हो मीच काढले. ” नखाने” ते कोरले आहे . आत्ताच दोन मिनिटांपूर्वी काढले आहे…
आपले नाव सर ..मी … आर बी मोकळे
सर आपण या माझ्याकडे बसून बोलूयात … इतक्यात शेजारीही म्हणाला जा ..जा ..बाबा तुम्हाला इथं बसण्यापेक्षा ह्यांच्याकडे बसल्यावर बोर होणार नाही.
तेही लगेच उठले आणि माझ्या स्टुडिओला आले. स्टुडिओ पाहून आनंदी झाले आणि संवाद सुरु झाला .
मी आर बी मोकळे .. माझे मुळगाव लासूर स्टेशन ( औरंगाबाद जवळ ) . इरिगेशन मधे ड्रायव्हर म्हणून नोकरीला होतो . आता रिटायर झालो आहे. निमगाव,गांगर्डा ,रायगड ,रत्नागिरी ,संगमनेर आणि भीमाशंकर येथे मी नोकरी केली . माझी दोन मुले आणि एक मुलगी यांचे शिक्षण झाले . ते आता चांगल्या ठिकाणी नोकरी करतात . भीमाशंकरहून मी राज्यभर खूप प्रवास केला. ट्रक आणि पोकलँड ड्राइव्हर म्हणून मी परिचित होतो. अत्यंत निगर्वी माणूस. बोलण्यात आपलेपणा . खरे तर ड्राइव्हर म्हटले कि आपले कान टवकरतात . आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आर बी मोकळे या ” टवकरण्याच्या ” पलीकडले होते. लहानपणी त्यांचे मित्र नखे वाढवायचे तसे यांनीही आपले नखे वाढविली . एक दिवस सहजच हातात कागद घेऊन काहीतरी नखाने कागद कोरता कोरता या ” नख चित्र ” छंदाचा जन्म झाला. आयुष्यभर ट्रक ड्राइव्हर म्हणून नोकरी केल्यानंतर निवृत्त झाल्यावर उरलेले आयुष्य कसे काढायचे असा यक्ष प्रश्न उभा राहिला असता परंतु या छंदाने पुढचे आयुष्य सुखकर केले आहे.हातात एक साधा खिशात बसेल इतका कागद असला कि झाले. पेन नको कि पेन्सिल हि नको . आडनावाप्रमाणे ” मोकळे ” … मात्र हातात काहीही नसताना , कोणतेही रंग न वापरता पांढऱ्या स्वच्छ कागदावर आपल्या “अदाकारीचे रंग ” भरणारा हा अवलिया विरळाच . अशी माणसं आयुष्याचा वाटेवर भेटत राहिली कि जगणे खरंच समृद्ध होत राहते.
आदरणीय मोकळे सर … ” चक्रधरा “… एक सॅल्यूट तुम्हालाही .

Share this content:
