कानसे : प्रतिनिधी – गणेश वाळुंज
मंगळवारपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
सालाबादप्रमाणे यंदाही कानसे गावात श्रीकाळभैरवनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्ताने ९ ते १७ एप्रिल दरम्यान भावभक्तीचा मळा फुलणार आहे. यात्रेच्या निमित्ताने येत्या मंगळवारपासून सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रबोधन करणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रमांसह कुस्त्यांचा जंगी आखाडा यात्रा महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.मंगळवारी ह.भ.प. ज्ञानेश महाराज फलके (आमोंडी), बुधवारी हभप श्रीकांत महाराज दुराफे (कुसुर, जुन्नर), गुरूवारी हभप संजय महाराज शेट्टी (मुंबई), शुक्रवारी हभप प्रसाद महाराज वाबळे (वडगाव सहाणी), शनिवारी हभप संतोष महाराज गारूळे (पैठण), रविवारी हभप अमोल महाराज सुळे (मोरोची), सोमवारी हभप सचिन महाराज शेटे (पारनेर), मंगळवारी सकाळी १० ते १२ दरम्यान हभप अमोल महाराज बडाख (श्रीरामपूर) यांचे काल्याचे कीर्तन, तर बुधवारी सकाळी १० ते १२ दरम्यान हभप अकुंश महाराज उगले (उगलेवाडी) यांचे रामजन्माचे कीर्तन होणार आहे. या व्यतिरिक्त सप्ताहा दरम्यान काकड आरती, भजन, नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि हरिजागर असे पहाटेपासून रात्रीपर्यंत अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून संध्याकाळी पंगतवार महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री काळभैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ धर्मदाय संस्था, कानसे ग्रामविकास मंडळ, कानसे ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीने महोत्सवात अध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचेही आयोजन करण्यात आले आहे. श्रीकाळभैरवनाथ धर्मदाय संस्था, ग्रामविकास मंडळ (मुंबई) आणि श्री काळभैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट यांच्या सौजन्याने मंगळवारी रात्री ११ वाजता लावणी सम्राज्ञी साधना पुणेकर या नाद करायचा नाय हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. बुधवारी सायंकाळी ३.३० वाजल्यापासून कुस्त्यांची जंगी दंगल होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या आखाड्यात उतरणार आहेत. विजयी मल्लांना रोख रकमांसह आकर्षक पारितोषिकांद्वारे गौरविण्यात येणार आहे. तर रात्री ८ वाजता लहान आणि मोठ्या गटासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
Share this content:
