प्रतिनिधी – मंचर
मंचर ( ता. आंबेगाव ) येथे बेकायदेशीर सावकारीचा प्रकार उघडकीस आला आहे. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडूनही सावकार व त्याचे सहकारी मालमत्तेच्या लालसेपोटी दमदाटी व मारहाण करून मानसिक छळ करत असल्याचा आरोप मंचऱ येथील काही व्यावसायिकांवर केला आहे. मंचर येथील शशिकांत बबनराव बढे यांच्यावर सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सहआरोपी म्हणून बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले, संजय भगवानराव काळे , मंदाबाई मारुती निघोट यांच्यावरही मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संजीवनी लहू बागल ( रा. मंचर ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , तक्रारदार संजीवनी लहू बागल हे कापड विक्रेते व्यावसायिक असून त्यांचा मंचर शहरात कपड्याचे दुकान आहे. २०२१ तक्रारदार व त्यांचे पती लहू बागल यांनी साईनाथ पतसंस्था मंचर यांचे कर्ज भरण्यासाठी व्यावसायिक शशिकांत बबन बढे यांच्याकडून ४५ लाख रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज नाईलाजास्तव सावकारी स्वरूपात दोन टक्के व्याज दरावर घेतले होते. तसा व्यवहार मंचर गावचे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले यांच्या ऑफिसमध्ये झाला होता. हा व्यवहार होते प्रसंगी तक्रारदार व त्यांचे पती लहू रामचंद्र बागल , तसेच संजय काळे, बाळासाहेब बाणखेले , शशिकांत बढे उपस्थित होते. या व्यवहारात ४५ लाख रुपयांच्या कर्जापोटी दोन टक्के व्याज ९० हजार रुपये प्रति महिना असे शशिकांत बढे यांनी मागितले होते. त्यावेळी बढे यांनी बागल यांना ४५ लाख रुपये दिलेल्या कर्जाच्या बदल्यात गहाण म्हणून संजीवनी लहू बागल यांच्या नावावर लक्ष्मी रोड मंचर येथील स्थावर मालमत्ता गौरव कलेक्शन असलेला गाळा मिळकत क्रमांक २८६१ /२६१२ याची नोटरी इसार पावती करून घेतली होती. ठरलेल्या करारानुसार बागल कुटुंबीयांनी बढे यांना वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात एकूण ५५ लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. असे असताना फिर्यादीकडून सावकार बढे यांनी आणखी पैसे व व्याज वाढवून द्यावे लागेल अशी दमदाटी करून संजीवनी बागल यांचे आयडीबीआय बँकेचे कोरे चेक व कोरे स्टॅम्प घेतले आहेत. तसेच २७ सप्टेंबर २०२२ रोजी शशिकांत बढे, बाळासाहेब बाणखेले , संजय काळे, मंदाबाई निघोट यांनी संगणमत करून फिर्यादीच्या दुकानावर जाऊन बढे यांचा व्यवहार पूर्ण करा नाहीतर तुमच्या दुकानाला कुलूप लावतो व ताबा घेतो असे म्हणून संजीवनी बागल व लहू बागल यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करून दमदाटी केली. त्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सावकार व त्यांच्या साथीदारांच्या मानसिक छळ्याच्या त्रासाने पती लहू बागल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे बागल यांची पत्नी संजीवनी बागल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पतीच्या निधनानंतरही बढे यांनी फिर्यादीकडून पाच टक्के व्याजदराने पैसे द्या नाहीतर तुमची इसार पावती रद्द करणार नाही. तुमचे दुकान ताब्यात घेईल व कोर्टाकडून दुकानाची खरेदीखत करून घेईल , माझे सहा लाख रुपये गेले तरी चालतील पण तुझी सुपारी देऊन तुला संपवेल अशी बढे यांनी संजवनी बागल यांना धमकी दिली होती. आम्ही पाच ते सहा कोटी रुपये मार्केटमध्ये व्याजाने दिलेले आहेत. आम्हाला जसे पैसे देता येतात तसे वसुलही करता येतात अशी धमकी बढे यांनी लहू बागल व संजीवनी बागल यांना दिली होती. शशिकांत बढे यांच्या सावकारकीच्या त्रासाला व धमक्यांना वैतागून संजीवनी बागल यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्याकडे खाजगी सावकार बाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने सहाय्यक निबंध सहकारी संस्था मंचर यांच्या कार्यालयात गोपनीय पाठवून संबंधित खाजगी सावकार शशिकांत बडे यांच्या व कारवाई करण्याकरता पत्र पाठवले होते. सदरील प्रकरणाच्या चौकशी अंती सहाय्यक निबंधक यांनी बागल यांचा अर्ज मान्य करून मंचर पोलीस ठाण्यात बडे यांच्याविरुद्ध तक्रार देण्याबाबत लेखी पत्राने कळविल्याने बागल यांनी मंचर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर रित्या सावकारी करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात शशिकांत बढे, बाळासाहेब बाणखेले, संजय काळे व व मंदाबाई निघोट यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम कायदा २०१४ नुसार कलम ३९ व ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सावकाराने इतरही लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दमदाटीने अधिक रक्कम वसूल करत असल्यास चे संजीवनी बागल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असून आरोपींची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी फिर्यादी बागल यांनी केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत. आरोपींवर ३१ मे रोजी गुन्हा दाखल झाला असून ११ जून रोजी खेड सत्र न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. परंतु अजूनही मंचर पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत असल्याचे फिर्यादी संजीवनी बागल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकार व त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे.
Share this content:
