
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
संत सोपानदेवांच्या पालखीसोबत अंजनगाव येथील अजित परकाळे यांचे घोडे असतात. आज सकाळी या घोड्यांचे अंजनगाव येथून टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले. त्याआधी सकाळी अश्वांना मंगल स्नान घालण्यात आले. त्यानंतर साज चढवण्यात आला. परकाळे कुटुंबातील महिलांनी अश्वांचे औक्षण केले. दोन्ही अश्वांची पूजा करून नंतर प्रस्थान झाले.
यावेळी अजित परकाळे, बापूसाहेब परकाळे, बारामती मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव परकाळे उपस्थित होते. सासवडवरून सुहास निबंधे, मधुकाका गोसावी, हरीकाका शिंदे, सुधाभाऊ गिरमे या प्रस्थान सोहळ्यासाठी आले होते. आज अश्वांचा मुक्काम मोरगाव येथे आहे. उद्या अश्व जेजुरी मुक्कामी पोचतील. परवा एकादशीच्या दिवशी सासवडला अश्वांचे आगमन होईल.
परकाळेंच्या घरामध्ये ही सेवा गेली साठहून अधिक वर्ष चालू आहे. वै. रामचंद्रबुवा परकाळेंच्या काळात ही अश्वांची सेवा त्यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव वै. सोपानकाका रामचंद्रबुवा परकाळे यांनी ३३ वर्ष अश्व घेऊन वारी केली. २०२२ पासून अजित परकाळे अश्व घेऊन वारीमध्ये येतात.
हे दोन्ही अश्व पालखी सोहळ्यासाठीच वापरले जातात. वर्षभर त्यांना एरवी कोणत्याही इतर कार्यासाठी वापरले जात नाही. वर्षभर त्यांची योग्य ती देखभाल परकाळे परिवारातर्फे केली जाते. दोन अश्वांपैकी राजा नावाचा अश्व श्रींच्या सेवेसाठी असतो. या अश्वावर सोपानदेव बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. दुसऱ्या राम नावाच्या अश्वावर जरीपटका घेतलेला स्वार बसतो. या स्वाराची व्यवस्था परकाळेंकडे असते तर जरीपटका संस्थान तर्फे दिला जातो. चंद्रकांत निगडे हे जरीपटका घेऊन या अश्वावर बसणार आहेत.
Share this content:
