प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२५ चा “साहित्यगौरव पुरस्कार ” आदर्श गाव वेताळेचे सुपुत्र आणि जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार बबन कदम तथा बी.के.कदम यांना जाहीर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली.येत्या रविवारी ३ ऑगस्ट रोजी चाकण येथील हाॅटेल गुडलक येथील हाॅलमध्ये हा भव्यदिव्य सोहळा होणार असल्याचे गाढवे म्हणाले. या प्रसंगी प्रसिद्ध कवी लेखक देवा झिंजाड, पुणे विद्यापीठ मराठी आभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.संदीप सांगळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, महेश शेवकरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जेष्ठ साहित्यिक बी.के.कदम हे वेताळे, ता.खेड येथील रहिवाशी असून त्यांनी काॅलेज जीवनापासून विविध विषयांवर लेखन केले आहे. जुन्या काळात लिहीता वाचता आले की, शिक्षण थांबवून अशा पाल्याला पालक घरच्या सटरफटर कामात जुंपून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असत. हाच धागा पकडून कदम यांनी “गणपाचं टाळकं खातंय मार ” हे समाजप्रबोधनपर वगगनाट्य लेखन करत त्याचे शेकडो प्रयोग ग्रामीण खेडोपाडी केले. श्री कदम यांचे ” आघात ” नाटक विशेष गाजले. अवदसा, भिमा काठचा क्रांतिवीर बंडकरी सतू मराडा, इरसाल गावटगे या त्यांच्या कादंब-या लोकप्रिय आहेत. त्यांच्या इरसाल गावटगे कादंबरीस २०२२ चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्याबरोबरच श्री. कदम यांनी चित्रपट पटकथा संवाद लेखनाचे विपुल कार्य केले आहे.त्यांच्या ” कायक ” या लघुपटास कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल मध्ये उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नॅशनल अवॉर्ड देण्यात आले. त्यांच्या साहित्य लेखनातील योगदानाची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुका उपाध्यक्ष सदाशिव अमराळे यांनी सांगितले.
या प्रसंगी श्रावणमासाचे औचित्य साधून कवी संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलनात शंभरहून अधिक कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान, मानसमैत्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होईल अशी माहिती जेष्ठ कवी डी.के. वडगावकर यांनी दिली आहे.
Share this content:
